योजनांची माहिती वेळेत द्या; पुणे जिल्हा परिषद सभेत प्रशासनाला अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागांच्या कामकाजावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. योजनांची माहिती वेळेत दिली जात नसल्याची, महत्त्वाचे विषय ऐनवेळी विषयपत्रिकेतून वगळले जात असल्याची आणि सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला फटकारत सर्व योजनांची सविस्तर माहिती प्रत्येक समितीमार्फत सदस्यांना वेळेत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यापुढे योजनांबाबत कोणतीही माहिती लपवली जाणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

सभेत आरटीई प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासह विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. निर्णय प्रक्रियेत जिल्हा परिषद सदस्यांचा अधिक प्रभावी सहभाग असावा, अशी मागणीही सदस्यांनी केली. योजनांची माहिती उशिरा मिळाल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.


दरम्यान, कृषी, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि कौशल्य विकास विभागांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. शेती उत्पादनवाढ, ग्रामीण आरोग्य सेवा, महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, आत्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), महिला प्रभाग संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) यांच्यासाठी कृषी अवजारे व साहित्य खरेदीसह विविध योजनांना सभेने मंजुरी दिली. प्रशासनाने योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखून सदस्यांना नियमित माहिती द्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.