‘मी जिवंत असताना दुसरं लग्न?’… पहिल्या पत्नीची पोलिसांसह मंडपात एंट्री; नवरदेवाने पळ काढताच थांबला विवाहसोहळा


कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सुरू असलेला एका विवाहसोहळा काही क्षणांतच रणांगणात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वधू-वरांच्या लग्नविधी सुरू असतानाच एक महिला थेट पोलिसांसह लग्नमंडपात दाखल झाली आणि स्वतःला नवरदेवाची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा केला. तिचा दावा ऐकताच उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थिती एवढी बिघडली की नवरदेवाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने दुसऱ्या लग्नाचा सोहळाच अर्धवट राहिला.

ही घटना कानपूरच्या चकेरी परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तरुणाचे नाव आसिफ मोहम्मद असून त्याने २०२२ मध्ये सहाना हसन हिच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर काही काळ दोघांचा संसार सुरू होता. मात्र, कौटुंबिक वाद वाढल्यानंतर २०२४ पासून दोघे वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

याच काळात सहाना हिने आसिफविरोधात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, आसिफने वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे दोघांमधील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांचा अद्याप कायदेशीर घटस्फोट झालेला नसल्याचा दावा पहिल्या पत्नीने केला आहे.

दरम्यान, आसिफ दुसरे लग्न करत असल्याची माहिती सहानाला मिळाली. त्यानंतर तिने पोलिसांना सोबत घेत थेट विवाहस्थळ गाठले. मंडपात पोहोचताच तिने नववधूला उद्देशून, “मी यांची पहिली पत्नी आहे. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे हे लग्न होऊ देणार नाही,” असे स्पष्ट सांगितले. तिचे बोलणे ऐकताच उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. दोन्ही कुटुंबीयांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही काळासाठी विवाहविधी थांबवण्यात आले.

या गोंधळादरम्यान आसिफने तिथून निसटण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. सध्या पोलिसांकडून महिलेच्या आरोपांची पडताळणी केली जात असून विवाह, न्यायालयीन वाद आणि कायदेशीर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील @PredatorVolk या हँडलवरून शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी भूमिका मांडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!