आजच्या Gen-Z ला काही बोलणंही अवघड; बदलत्या सवयींबाबत विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेन-झी पिढीची चर्चा सुरू आहे. मागील १२ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही, ते जेन-झीने करून दाखवलं. त्यांनी मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा दावा केला जात आहे.
नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ त्यांनी सलग महिनाभर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केलं. पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन सुरू ठेवत त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली. अखेर सरकारने माघार घेतल्याचे सांगितले जात असून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

या आंदोलनानंतर जेन-झीची देशभर चर्चा सुरू असतानाच नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या पिढीबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. आताच्या जेन-झीला काही बोलणंही मुश्कील झालं आहे, असे ते म्हणाले.


तसेच, सध्याच्या तरुणांचा मोबाईल स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगत त्यांनी, “पाच ते सात सेकंदांत मेंदू इकडून तिकडे जंप करत आहे. त्यामुळे मेंदूत नेमका काय ‘केमिकल लोचा’ होत आहे, हे कुणालाच ठाऊक नाही,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे.
रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त नागपूरमध्ये भोसला मिलिटरी स्कूलतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संवादादरम्यान ते म्हणाले, सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढला आहे. सेकंदागणिक मन स्क्रोल होत आहे. त्यातून ‘केमिकल लोचा’ निर्माण झाला आहे. बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांकासह कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असायला हवी. यासाठी उमलत्या वयापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेन-झी भारताचे भविष्य आहे, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही.
यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या कामाविषयीही भाष्य केले. “पोलीस असो वा सीमेवरील जवान, त्यांची ड्युटी ही ‘थँकलेस जॉब’ आहे. कितीही काम केले तरी पोलिसांना टीका सहन करावीच लागते. गेल्या आठ दिवसांपासून तर मी अधिकच टीका सहन करत आहे,” असेही ते म्हणाले.