पुणेकरांनो सावधान! पुढील 2 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; ‘या’ ठिकाणी जाणं टाळाच, हवामान विभागाचा इशारा


पुणे : पुणे जिल्हा आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात 31 जुलैपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. अधूनमधून ऊन पडण्याची शक्यता असली तरी पावसाचा प्रभाव पूर्णपणे कमी होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, दुपारनंतर पुन्हा हलक्या सरींना सुरुवात झाली आणि रात्री पावसाचा जोर वाढला. रविवारीही सकाळी हलका पाऊस झाल्याने दिवसभर ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. रविवारी शहरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

सोमवार (27 जुलै) आणि मंगळवार (28 जुलै) रोजी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असली तरी पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे.

सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टेकड्या, धबधबे आणि जंगल परिसर हिरवाईने बहरले आहेत. त्यामुळे विकेंडला लोणावळा, मुळशी, ताम्हिणी आणि इतर पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अनेक घाटरस्त्यांवर चिखल साचला असून रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच काही ठिकाणी झाडे पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत.

यामुळे पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत पुणे जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. मुळशी तालुक्यातील गिरिवन येथे सर्वाधिक 36.0 मिमी, कुरवंडे येथे 24.5 मिमी, तर माळीण येथे 15.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!