20 वर्षांचा संसार, पण लपलं होतं मोठं रहस्य? पुण्यात पत्नीची धक्कादायक तक्रार; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा


पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 वर्षांपासून संसार करणाऱ्या एका विवाहित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लग्नापूर्वी पतीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब जाणीवपूर्वक लपवून आपली फसवणूक करण्यात आली, असा गंभीर आरोप महिलेने केला असून, याप्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय महिलेचा विवाह 2006 मध्ये पारंपरिक पद्धतीने झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे वाटत असले तरी काही वर्षांनंतर पतीच्या वागणुकीत सातत्याने बदल जाणवू लागल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. यानंतर तिला पतीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती समलैंगिक असल्याचा आणि त्याचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा संशय तिला लग्नानंतर आला. ही बाब विवाहापूर्वी पतीसह त्याच्या कुटुंबीयांना माहीत असूनही ती जाणीवपूर्वक लपवण्यात आली. सत्य दडवून विवाह लावून दिल्यामुळे आपले वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि गेली अनेक वर्षे मानसिक त्रास सहन करावा लागला, असा आरोप तिने केला आहे.

तक्रारीत केवळ पतीच नव्हे तर सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. लग्नानंतर वारंवार मानसिक दबाव टाकण्यात आला, प्रश्न विचारल्यास दुर्लक्ष करण्यात आले आणि सत्य लपवण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा दावा करत तिने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

महिलेने तब्बल दोन दशकांनंतर पोलिसांकडे धाव घेतल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पती आणि सासरच्या पाच सदस्यांविरोधात फसवणूक तसेच मानसिक छळासंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता तपासण्यासाठी संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली असून विवाहावेळचे दस्तऐवज, कुटुंबीयांचे जबाब आणि इतर पुरावेही तपासले जात आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रारीतील सर्व आरोपांची स्वतंत्र पडताळणी केली जात असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे कायदा व सामाजिक क्षेत्रातही विशेष लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!