आयटीयन्ससाठी मोठी खुशखबर! हिंजवडी मेट्रोला अखेर ग्रीन सिग्नल; ट्रॅफिक जॅममधून सुटका, आता कधी धावणार?

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि बहुप्रतिक्षित आनंदाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ च्या पहिल्या टप्प्याला अखेर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांची अधिकृत सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होण्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता फक्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
या प्रकल्पांतर्गत माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या दरम्यानच्या १२ स्थानकांच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सीएमआरएसच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्ग, स्थानके आणि तांत्रिक यंत्रणांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने सर्व आवश्यक तांत्रिक पूर्तता आणि अनुपालनाचा अहवाल सादर केला. या सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर सुरक्षा मंजुरी देण्यात आली.

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य विद्युत निरीक्षकांची ना-हरकत, दूरसंचार विभागाचा परवाना, सर्व १२ स्थानकांसाठी अग्निशमन विभागाचे एनओसी (NOC), तसेच ट्रॅक, सिग्नलिंग, टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉकशी संबंधित सर्व वैधानिक प्रमाणपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तांत्रिक आणि सुरक्षा निकष पूर्ण झाले आहेत.


आता मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, मुख्यमंत्री यांची तारीख निश्चित होताच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याकडे हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचारी आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
या मंजुरीबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यांनी सांगितले की, “मार्गिका-३ च्या पहिल्या टप्प्याला मिळालेली वैधानिक सुरक्षा मंजुरी हा प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पुणेकरांच्या सेवेत आधुनिक आणि सुरक्षित मेट्रो आणण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक निर्णायक पाऊल टाकले आहे.”
तर पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, “पहिल्या टप्प्याला मिळालेली सुरक्षा मंजुरी ही पुणेकरांसाठी मोठा दिलासा आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री यांची वेळ मागितली असून, तारीख निश्चित होताच मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल.”
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे लाखो आयटी कर्मचारी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.