पुणेकरांनो अन् मुंबईकरांनो, ट्रॅफिकच्या समस्येवर सरकारचा मेगा प्लॅन; जाणून घ्या काय बदलणार?


मुंबई : मुंबई-पुणे दरम्यान वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन राज्य सरकारने जुना राष्ट्रीय महामार्ग (NH-48) आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विस्ताराचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. दोन्ही महामार्गांचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर 2030 पर्यंत मुंबई-पुणे मार्ग तब्बल 16 पदरी होणार असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

सध्या चार पदरी असलेल्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे सहा पदरीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे सरकला असून, या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) देण्यात आली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पात खंडाळा, लोणावळा आणि खोपोली परिसरात बायपास मार्ग उभारण्याची योजना आहे. तसेच कळंबोली ते शिळफाटा दरम्यान आठ पदरी रस्ता, विविध इंटरचेंज आणि तळेगाव, खोपोली व खालापूर परिसरात 13 नवीन उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे.

कामाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेला जुना मुंबई-पुणे महामार्ग आज राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) चा भाग असून तो पुढे बंगळुरू आणि चेन्नईपर्यंत जोडला जातो.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचेही सहा पदरांवरून दहा पदरीकरण करण्याची योजना एमएसआरडीसीने तयार केली आहे. या विस्तारासाठी सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील वर्षापासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

द्रुतगती महामार्गावरील वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी यापूर्वी ‘मिसिंग लिंक’ (आताचे ‘कनेक्टिंग लिंक’) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुमारे 6,790 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दोन आधुनिक बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.

याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक द्रुतगती महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील 50 वर्षांचा विचार करून दोन्ही शहरांदरम्यान अखंड आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!