200 लिटर तेलात फक्त दोन थेंब अन् संपलं सहा जणांचं कुटुंब! मोहरीच्या तेलातील भेसळीचा थरकाप उडवणारा खुलासा

पलामू : मोहरीच्या तेलातील घातक भेसळीमुळे एका कुटुंबातील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यात उघडकीस आली आहे. तपासात मोहरीच्या तेलामध्ये आर्गेमोन मेक्सिकाना (सत्यनाशी/पिवळा धोतरा) या विषारी वनस्पतीच्या तेलाची भेसळ झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे ‘एपिडेमिक ड्रॉप्सी’ हा दुर्मिळ पण जीवघेणा आजार झाल्याने हे मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
या दुर्घटनेत अनुज महतो यांनी अवघ्या दोन आठवड्यांत वडील, आई, पत्नी, भाऊ आणि दोन बहिणी अशा सहा जवळच्या नातेवाईकांना गमावले. “माझ्यात आता कोणतीच हिंमत उरलेली नाही. मी फक्त त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठीच घरी पोहोचलो,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

घटनाक्रमानुसार, 19 जून रोजी कुटुंबप्रमुख कुलदीप महतो यांचे निधन झाले. दुसऱ्याच दिवशी मोठी मुलगी बबिता कुमारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बंगळुरूहून घरी परतलेल्या अनुज यांच्या डोळ्यांसमोर 26 जूनला धाकटी बहीण इंदू, 28 जूनला पत्नी श्वेता, 29 जूनला भाऊ नकुल आणि 8 जुलैला आई लाखो देवी यांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण कुटुंबातून फक्त सुनील महतो हे उपचारानंतर बचावले.


रुग्णांमध्ये सुरुवातीला उलट्या, शौचातून रक्तस्राव, पायांना सूज, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून आली होती. डॉक्टरांना अन्नातून विषबाधेचा संशय आल्याने घरातील मोहरीचे तेल, पीठ, डाळी, तांदूळ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेडिकल कॉलेज आणि राज्य अन्न परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालात मोहरीच्या तेलात आर्गेमोन तेलाची भेसळ असल्याचे सिद्ध झाले.
तपासादरम्यान संबंधित कुटुंबाने बाजारातील नव्हे तर स्वतः पिकवलेल्या मोहरीपासून तेल तयार केल्याचे सांगितले. त्यामुळे आर्गेमोनच्या बिया मोहरीत कशा मिसळल्या, याचा तपास सुरू आहे. या भागात जनावरांवरील उपचारासाठी आर्गेमोन तेलाचा वापर केला जात असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने सिक्का गावातील 195 कुटुंबांतील 1,378 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले. 56 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली; मात्र सुदैवाने इतर कोणामध्येही एपिडेमिक ड्रॉप्सीची लक्षणे आढळली नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, आर्गेमोनच्या बियांमध्ये ‘सांग्विनेरिन’ हा अत्यंत विषारी घटक असतो. तो शरीरात गेल्यानंतर रक्तवाहिन्या, फुफ्फुसे, हृदय आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होतात. विशेष म्हणजे 200 लिटर मोहरीच्या तेलात आर्गेमोन तेलाचे अवघे दोन थेंब मिसळले तरी गंभीर विषबाधा होऊ शकते, असा इशाराही अन्न सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबाला आर्थिक मदत, रोजगाराची संधी आणि गावागावांत आर्गेमोनच्या धोक्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. 2011 नंतर भारतात नोंदवले गेलेले एपिडेमिक ड्रॉप्सीचे हे पहिले मोठे प्रकरण मानले जात असून, या घटनेने अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.