पुणेकरांसाठी मोठा दिलासा! पाणीकपातीचे संकट टळले; दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय अखेर मागे

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, शहरात लागू करण्यात आलेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
जून महिन्यात कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने पाणी वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुलै महिन्यात राज्यासह पुणे आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.

महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 20.16 टीएमसी (69.17 टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला धरणसाखळीत 23.11 टीएमसी (79.28 टक्के) पाणीसाठा होता. यंदा तो सुमारे 2.95 टीएमसीने कमी असला तरी पाणलोट क्षेत्रात अद्यापही चांगला पाऊस सुरू असल्याने आगामी काळात धरणांतील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने शहरातील नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन प्रशासनाने पुणेकरांना केले आहे.