स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! MPSCने दुप्पट केल्या गट-कच्या जागा; १,५३९ तलाठींसह ५,७०७ पदांवर मेगा भरती

मुंबई : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये तब्बल ३,०८८ नव्या पदांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे एकूण पदसंख्या २,६१९ वरून ५,७०७ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, या भरतीत १,५३९ तलाठी पदांचा समावेश करण्यात आल्याने महसूल विभागात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. आयोगाने अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढही जाहीर केली आहे.
२५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ मध्ये सुरुवातीला २,६१९ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या नव्या मागणीपत्रांच्या आधारे आयोगाने सुधारित शुद्धिपत्रक काढून आणखी ३,०८८ पदांचा समावेश केला आहे. त्यामुळे ही भरती राज्यातील यंदाच्या सर्वात मोठ्या भरतींपैकी एक मानली जात आहे.

सुधारित पदांमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – १,५३९, लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग) – ४८०, लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – ३३९, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – २५४, नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा कार्यालय – २३०, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – १५५, आदिवासी विकास विभाग – ६९, तसेच वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल आणि सहायक अधीक्षक अशा विविध संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे.


आयोगाने अर्ज प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही जाहीर केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ८ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन OMR पद्धतीने होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय परीक्षार्थ्यांच्या मागणीनंतर घेण्यात आला आहे.
एमपीएससीने उमेदवारांना महत्त्वाचा इशाराही दिला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागांचे सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय सुधारित तक्ते प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यामुळे सध्याची पदसंख्या पाहून अर्ज टाळू नये. अर्ज न भरल्यास पुढे कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. वाढलेल्या पदसंख्येमुळे यंदाच्या गट-क भरतीत हजारो उमेदवारांना सरकारी सेवेत प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.