संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या विसाव्यावरुन विवाद ! पालखी सोहळा प्रमुख व उरुळीकांचन ग्रामस्थांत वाद

उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात नेण्यास नकार दिला आहे . हा नकार पालखी सोहळा प्रमुखांनी दिला असल्याने पालखी सोहळ्याच्या या भूमिकेची उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर प्रचंड वादावादी झाली .

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० ते २८ जून यादरम्यान चा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या पालखी सोहळ्यात पारंपारीकरीत्या उरुळी कांचन चा दुपारचा विसावा घेऊन पालखी रात्रीच्या मुक्कामास यवत मुक्कामी मार्गस्थ होण्याची परंपरा आहे.
या परंपरेनुसार उरुळीकांचन गावचा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात विसावा न होता. तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

संस्थांनच्या विश्वस्तांच्या आडमुठेपणामुळे पालखी सोहळा परंपरेनुसार गावातील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी येणार नाही या संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सोहळा प्रमुख यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध करत पालखी सोहळा गावातून मंदिर मार्गे महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर विसाव्यासाठी थांबवावा अशी भूमिका घेतली.

जर तो पर्याय पण मान्य नसेल तर पालखी सोहळा उरुळी कांचन मार्गे नेवू नका कोठून दुसरीकडून न्याह्यचा तिकडून न्या असा सज्जड दम सरपंच राजेंद्र ब.कांचन, माजी सरपंच संतोष ह. कांचन, दत्तात्रय शां.कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ल. कांचन, अमित कांचन,सुनील तांबे, मिलिंद जगताप, शंकर बडेकर यांच्यासह प्रसाद कांचन,आबासाहेब चव्हाण,सागर पांगरे,अभिषेक कांचन आदी ग्रामस्थांनी दिला.
हा वाद मिटविण्यासाठी आज हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी आणि उरुळी कांचन ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक त्यांच्या कार्यालयात बोलावली होती, मात्र या बैठकीत प्रचंड गोंधळ होण्याने निर्णय अनिर्णित राहिला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.