‘माझ्या मृतदेहाला त्याच्याच हाताने मंगळसूत्र घाला…’ 8 वर्षांच्या प्रेमाचा थरारक शेवट; प्रियकराच्या घरासमोर पार्थिव ठेवल्याने उडाली खळबळ
आंध्र प्रदेश : आठ वर्षे प्रेमात राहिल्यानंतर प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच एका 26 वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाने सर्वांना हादरवणारे वळण तिच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामुळे आले. त्या पत्रातील शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी थेट तिचे पार्थिव प्रियकराच्या घरासमोर नेले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला, आंदोलन झाले आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील कोंद्रुपाडु गावची रहिवासी कीर्ति ही मुंबईत एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. सोशल मीडियावरून तिची ओळख साई सुमंत या तरुणाशी झाली होती. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि गेली आठ वर्षे दोघेही एकमेकांसोबत नात्यात होते. साई सध्या कतारमध्ये हार्डवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे.
दरम्यान, साईच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरवल्याची माहिती कीर्तीला मिळाली. या निर्णयामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली. अखेर 14 जुलै रोजी मुंबईतील तिच्या पीजी निवासस्थानी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 16 जुलै रोजी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यानंतर तिच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र समोर आले. या पत्रात तिने आपल्या मृत्यूनंतरची एक भावनिक इच्छा व्यक्त केली होती. “माझ्या मृतदेहाला साईच्या हातून मंगळसूत्र घालण्यात यावे आणि माझ्यावर अंत्यसंस्कार त्याच्याच गावात व्हावेत,” अशी विनंती तिने केली होती.

मुलीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी थेट आंध्र प्रदेशातील पोंडुरु गाव गाठले. त्यांनी कीर्तीचे पार्थिव साई सुमंतच्या घरासमोर ठेवत आंदोलन सुरू केले. साईने कतारहून भारतात परत यावे आणि तिच्या मृतदेहाशी विवाह करावा, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रकार समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
घडामोडींची माहिती मिळताच साईच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून तेथून निघून गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतप्त जमावाने घराचे कुलूप तोडले. काही काळ दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये वादावादी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच टंगुटुरु पोलीस ठाण्याचे अधिकारी फणी भूषण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली.
अखेर चर्चेनंतर साईच्या कुटुंबीयांनी पोंडुरु गावातच कीर्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास संमती दिली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत आणि तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
या घटनेने प्रेमसंबंध, कौटुंबिक निर्णय आणि मानसिक तणाव यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका अपूर्ण प्रेमकहाणीचा शेवट केवळ एका आत्महत्येपुरता मर्यादित राहिला नाही, तर मृत्यूनंतरच्या एका शेवटच्या इच्छेमुळे संपूर्ण गावाला हादरवून सोडणाऱ्या अभूतपूर्व घटनेत त्याचे रूपांतर झाले.