‘प्रेम’, धमक्या अन् खाकीचा गैरवापर! PSIच्या जाळ्यात अडकली शिक्षिका; चार वर्षांचा छळ उघड, फरारी अधिकाऱ्याचा काळा इतिहासही समोर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून पोलीस दलाला हादरवणारे गंभीर प्रकरण समोर आले आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या ग्रेड पोलीस उपनिरीक्षक (PSI) हरीश माधवराव खटावकर (वय ५३) यांच्याविरोधात एका ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेने लैंगिक अत्याचार, धमकी, मारहाण आणि जबरदस्तीने नेल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंद होताच आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

पीडित महिला खासगी शाळेत शिक्षिका असून तिची आणि आरोपीची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. तक्रारीनुसार, या ओळखीचे रूपांतर विश्वासात करून आरोपीने तिच्याशी सातत्याने संपर्क ठेवला. हॉटेलमध्ये काम असल्याचे, तसेच घराच्या इंटिरिअरची पाहणी करायची असल्याचे कारण देत त्याने तिला अनेकदा बोलावले. या भेटीदरम्यान तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. विरोध केल्यास पती आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गप्प बसण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार एकदाच घडला नाही. मानसिक दबाव, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगच्या जोरावर आरोपीने दीर्घकाळ तिचे शोषण केले. सततच्या भीतीमुळे ती कुणाकडेही तक्रार करू शकली नाही. मात्र आरोपीकडून वारंवार येणारे फोन आणि संदेश यामुळे तिच्या पतीला संशय आला. त्यांनी आरोपीला फोन करून विचारणा केली असता, “माझे तिच्यावर प्रेम आहे,” असे उत्तर देत त्याने फोन कट केल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. त्याचाच फायदा घेत १५ जुलै रोजी आरोपी थेट पीडितेच्या घरी पोहोचल्याचा आरोप आहे. त्याने महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. कारमध्ये सय्यद निसार नावाचा चालक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रवासादरम्यान आरोपीने महिलेला मारहाण केली, तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि रात्री उशिरा शहरातील दूध डेअरी चौक परिसरात रस्त्यावर सोडून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडितेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस तपास सुरू होताच आरोपी फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हरीश खटावकर हा १९९३ मध्ये पोलीस दलात दाखल झाला होता. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावल्यानंतर तो सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत होता. मात्र यापूर्वीही एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर विभागीय कारवाई आणि निलंबन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या वर्तनाचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर केला आहे. आरोपीविरुद्ध खात्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असून त्याला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. पीडितेला न्याय मिळावा, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि पोलीस दलातील अशा प्रकारांना आळा बसावा, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे. दुसरीकडे, या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.