महामार्गावर बेशिस्त पार्किंगला लोणी काळभोर पोलिसांचा लगाम; एकाच दिवशी तीन चालकांवर गुन्हे

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष पेट्रोलिंग मोहिमेदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या तीन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईमुळे महामार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अजय गुलाब गायकवाड (रा. कुंजीरवाडी), सतीश भगवान खेडेकर (रा. कदमवाकवस्ती) आणि सिद्दीक मैनुद्दीन मुलाणी (रा. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. १६) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे व धोकादायक स्थितीत वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

पहिल्या कारवाईत कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन चौकाजवळील शांताई हॉटेलसमोर अजय गायकवाड याने त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट (एमएच-१२ डब्ल्यूयू-५५५४) ही कार महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभी केल्याचे आढळले. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या कारवाईत लोणी स्टेशन चौक परिसरात सतीश खेडेकर याने टाटा कंपनीचा टँकर (एमएच-१३ सीयू-०७७७) सार्वजनिक रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान कामगार घेण्यासाठी थांबल्याचे चालकाने सांगितले. मात्र, धोकादायक पद्धतीने वाहन उभे केल्यामुळे त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
तिसऱ्या कारवाईत थेऊर फाटा येथील रेल्वे पुलाजवळ सिद्दीक मुलाणी याने अशोक लेलँड ट्रक (एमएच-१२ टीव्ही-२१०१) रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्याने त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने अशा प्रकारची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करून महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.