तुकाराम मुंढेंच्या नावाचा गैरवापर महागात! ‘जवळचे संबंध’ सांगणाऱ्या पुण्यातील डॉक्टरवर FDAचा दणका, गुन्हा दाखल


पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुक्तांशी जवळचे संबंध असल्याचा दावा करून शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका डॉक्टरविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयिताचे नाव डॉ. हिमांशू अजवाणी (वय ४८, रा. पुणे) असे आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

व्हॉट्सॲपवरील ‘तो’ मेसेज ठरला महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. हिमांशू अजवाणी यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर स्वतःचा उल्लेख “अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा डॉक्टर” असा केला होता.

तसेच, “मुंढे साहेबांशी माझे अत्यंत जवळचे संबंध असून त्यांच्या ओळखीने कोणतेही शासकीय काम करून देऊ शकतो,” असा दावाही त्यांनी केला होता. हा मेसेज सोशल मीडियावर आणि विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर ही बाब FDA प्रशासनाच्या निदर्शनास आली.

FDAची तातडीने कारवाई

तुकाराम मुंढे यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. विभागाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये म्हणून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. हिमांशू अजवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!