‘पल्लवीच्या शांत चेहऱ्यामागे वेदना होत्या का?’ अकोल्यात विवाहितेच्या मृत्यूने खळबळ; पतीसह सासरचे सहाजण पोलिसांच्या रडारवर

अकोला : अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एका विवाहितेच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पल्लवी प्रदीप मोरे या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर मानसिक छळाचा आरोप केला असून, पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डाबकी रोड परिसरात राहणाऱ्या पल्लवी मोरे यांचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. पल्लवी यांच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लग्नानंतर पल्लवी यांना सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. कौटुंबिक कारणांवरून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि या त्रासाला कंटाळूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीनंतर डाबकी रोड पोलिसांनी पती प्रदीप मोरे यांच्यासह दयाराम मोरे, गीता दयाराम मोरे, संदीप दयाराम मोरे, सपना संदीप मोरे आणि चैताली संदेश पहुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत पती प्रदीप मोरे आणि सासरे दयाराम मोरे यांना अटक केली आहे. तर इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून आता पल्लवी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौटुंबिक वाद, मानसिक त्रास किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास सुरू आहे. यासाठी पोलिसांकडून नातेवाईकांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली असून, पल्लवी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.