‘स्लो पॉयझन’पासून लोहगडावरून ढकलण्यापर्यंत… केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक कटाचा पर्दाफाश; पोलिसांना मिळाले ‘जपानी ट्रेनिंग’चे पुरावे

पुणे : पुण्यातील उद्योजक आणि कोट्यधीश तरुण केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अंगावर काटा आणणारे नवे खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ अचानक रागाच्या भरात नव्हे, तर अत्यंत थंड डोक्याने आणि टप्प्याटप्प्याने हा खून घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचे लग्न निश्चित झाल्यानंतरच आरोपींनी त्याला संपवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला केतनचा थेट खून करण्याऐवजी त्याला हळूहळू गंभीर आजारी पाडण्याचा किंवा कायमस्वरूपी अपंग करण्याचा डाव आखण्यात आला होता. यासाठी त्याला ‘स्लो पॉयझन’ देण्याची योजना तयार करण्यात आली होती. जेवणातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न करण्याची तयारीही आरोपींनी केली होती. मात्र, वेळेत विष उपलब्ध न झाल्याने हा कट फसल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
पहिली योजना अपयशी ठरल्यानंतर आरोपींनी अधिक टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले आणि तेथून दरीत ढकलून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण कटामागे पूर्वनियोजन असल्याचे अनेक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

याच तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलिसांच्या चौकशीतून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, चौकशीदरम्यान कोणती भूमिका घ्यायची आणि संशय टाळण्यासाठी कसे वागायचे, याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आरोपींनी इंटरनेटवरील एका सुमारे दोन तासांच्या जपानी व्हिडिओचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. अटकेनंतर पोलिसांनी दोघांचे मोबाईल आणि लॅपटॉप तपासले असता वेब हिस्ट्रीमध्ये संबंधित व्हिडिओचे पुरावे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे, मानसिक दबावात शांत कसे राहायचे आणि चौकशीदरम्यान आत्मविश्वासाने उत्तरे कशी द्यायची, याबाबत मार्गदर्शन असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी संबंधित लिंक्स आणि डिजिटल पुरावे जप्त केले असून त्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.
दरम्यान, ‘स्लो पॉयझन’चा कथित कट, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या हालचालींची साखळी यामुळे तपास अधिक मजबूत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयात भक्कम बाजू मांडण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केली असून, आगामी सुनावणीत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.