मोठी बातमी! कोल्हापुरात भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; शहरात एकच खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात भरदिवसा भाजपच्या एका कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुरज साखरे असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तो खासगी सावकारीचा व्यवसाय करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी सुरज साखरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
