“शरद पवारांनी NDA मध्ये यावं, अजूनही उशीर झालेला नाही”; रामदास आठवलेंची खुली ऑफर, ‘राष्ट्रपतीही झाले असते’ म्हणत मोठा दावा

नांदेड : राज्यात शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं राजकीय वक्तव्य करत शरद पवारांना थेट एनडीएमध्ये सहभागी होण्याचं खुलेआम निमंत्रण दिलं आहे. नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, “शरद पवारांनी अजूनही निर्णय घ्यावा. एनडीएचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत यायला काहीच हरकत नाही.”

आठवले यांनी यावेळी भूतकाळाचा संदर्भ देत मोठा दावा केला. “शरद पवार २०१४ किंवा २०१९ मध्ये एनडीएमध्ये आले असते, तर त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी गंभीरपणे विचार झाला असता. त्यांनी मला राष्ट्रपती व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असता,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा फायदा एनडीएला निश्चितच होईल. सध्या त्यांच्या पक्षाचे आठ खासदार असून त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला तर तेही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आघाडी अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलताना आठवले यांनी सांगितले की, एकेकाळी त्यांनी शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये विलीन करण्याचाही सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी तो निर्णय झाला नाही. तसेच काँग्रेससोबत संबंध अधिक दृढ झाल्यामुळे मनमोहन सिंग यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आणि त्या काळात पवार यांनाही पंतप्रधानपदाची संधी मिळू शकली असती, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी आठवले यांनी इतर विरोधी पक्षांनाही एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं. अनेक खासदार विकासाच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यासोबत येत असल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही नेते भविष्यात एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलताना आठवले यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. रिपब्लिकन विचारांचे सर्व गट एकत्र आले तर पक्षाची ताकद वाढेल, असे सांगत भविष्यात प्रकाश आंबेडकर यांनी सोबत आल्यास त्यांना मंत्रीपद देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
रामदास आठवले यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले असून, शरद पवार यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.