स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा? शासन देत आहे ५०% अनुदानासह कर्ज; पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पुणे : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध स्वयंरोजगार योजनांअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून पात्र लाभार्थ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान, कमी व्याजदरात कर्ज आणि बीज भांडवलाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्वयंरोजगाराला चालना देणे आणि नवउद्योजक तयार करणे हा आहे. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत या योजना राबविल्या जात असून लाभार्थ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी २५ हजार रुपयांचे थेट अनुदान दिले जाणार असून उर्वरित २५ हजार रुपये बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध होतील. किरकोळ व्यवसाय, लघुउद्योग, सेवा व्यवसाय तसेच उपजीविकेला पूरक विविध उद्योगांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय ५० हजार रुपयांपेक्षा अधिक आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी बीज भांडवल योजना उपलब्ध असून या योजनेत महामंडळाकडून अनुदानासह बीज भांडवल दिले जाणार आहे, तर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बहुतांश रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होईल. लाभार्थ्याला केवळ ५ टक्के स्वतःचा सहभाग द्यावा लागणार असून कर्जफेडीसाठी ३ ते ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

व्यवसायासाठी तातडीने निधी आवश्यक असलेल्या लाभार्थ्यांसाठी थेट कर्ज योजनेचाही पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ ४ टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाणार असून त्यामध्ये ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान, ४५ हजार रुपये कर्ज आणि ५ हजार रुपयांचा लाभार्थी सहभाग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या सर्व योजनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून लाभार्थ्यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महाडिशा पोर्टलवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अपूर्ण किंवा कागदपत्रांशिवाय सादर करण्यात आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून शासनाच्या या स्वयंरोजगार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.