महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! जूनचा १,५०० रुपयांचा हप्ता खात्यात; जुलैमध्ये किती पैसे मिळणार?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना रक्कम जमा झाल्याचे एसएमएसही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना अखेर दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने सर्व लाभार्थींच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी घाबरून न जाता काही दिवस प्रतीक्षा करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, हप्ता वितरणासोबतच सरकारने लाभार्थी यादीची मोठ्या प्रमाणावर छाननी केली आहे. महिला व बालविकास विभागाने ‘नारीशक्ती दूत’ ॲप, आधार पडताळणी, बँक खात्यांची माहिती आणि अर्जातील तपशीलांची तपासणी केल्यानंतर तब्बल ९२ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये ई-केवायसी न केलेल्या, बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या, एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या तसेच योजनेच्या उत्पन्न निकषात न बसणाऱ्या अर्जदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातून २ कोटी ४० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक छाननीनंतर हा आकडा सुमारे २ कोटी ३० लाखांवर आला. त्यानंतर तांत्रिक पडताळणी आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर सध्या सुमारे १ कोटी ३८ ते १ कोटी ४० लाख महिलांनाच नियमित लाभ दिला जात आहे. उर्वरित अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पडताळणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांतही नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.