देशात नेमकं चाललंय तरी काय? श्रीरामाच्या नावानं मोठा घोटाळा, पत्त्यावर कॉलेजच नाही, पण दरवर्षी परीक्षा अन् पदव्या वाटप…

भोपाळ : गेल्या काही दिवसांपासून देशात शिक्षण क्षेत्रात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. कधी पेपर फुटले तर कधी बोगस प्रकरणे समोर आली. असे असताना आता श्रीरामाच्या नावानं झालेला एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. बीएड आणि शिक्षक प्रशिक्षण कॉलेजांचं कागदांवरील साम्राज्य उघडकीस आलं आहे.

याठिकाणी अनेक कॉलेज शेतांमध्ये, ओसाड जागांवर नोंदणीकृत आहेत. तिथे गेल्यावर दिसणारी परिस्थिती वेगळीच आहे. राजधानी भोपाळमधील विदिशा रोडवर श्रीराम कॉलेज आहे. भूखंड क्रमांक १४८/१४९/२/१ वर श्रीराम कॉलेजची नोंद आहे. या कॉलेजमधून दरवर्षी १५० विद्यार्थी बीएड आणि बीएससी बीएड शिकून बाहेर पडतात.
काही कॉलेज लहान शाळांच्या परिसरांमध्ये भरत आहेत. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर तीन-तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीत अनेक त्रुटी आणि गायब पत्ते सापडल्यानंतरही बरकतउल्ला विद्यापीठानं केवळ एका नोटरी शपथपत्राच्या आधारावर १२५ खासगी बीएड कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे.

या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे. या कॉलेजच्या पत्त्यावर श्रीराम कॉलेज नावाची कोणतीही संस्था दिसत नाही. या परिसरात तीन भवन आहेत. त्यातील एक बंद होतं. दुसऱ्यावर मिलेनियम ग्रुपचा फलक होता. तर तिसऱ्याचं काम सुरू आहे. त्याच्या बाहेर बगलामुखी कॉलेजचा फलक लावण्यात आलेला होता.

यामुळे सगळा बोगस कारभार समोर आला आहे. हा सगळा प्रकार गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. श्रीराम कॉलेजच्या नावावर नोंद असलेल्या भूखंड क्रमांक १४८ वर केवळ एक रिकामं शेत आहे. तिथे शेती होते. पण तिथे कॉलेज, वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय नाही. कागदांवर मात्र दरवर्षी प्रवेश होतात, परीक्षा घेतल्या जातात आणि पदव्याही वाटल्या जातात. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.