पुण्यात मोठा दरोडा टळला! चोरीच्या बोलेरोचा शोध घेताना उघडकीस आली आंतरराज्यीय टोळी; ६ जण जेरबंद


पुणे : पुणे जिल्ह्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या बोलेरोचा शोध घेत असताना हा संपूर्ण कट उघडकीस आला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आणि पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे, चोरीची बोलेरो आणि इतर साहित्य असा १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमधील लोणी प्रवरा येथून बोलेरो जीप चोरीला गेली होती. वाहनाचा शोध घेत असताना मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप यांना ओतूर परिसरात संशयास्पदरीत्या तीच बोलेरो दिसली. त्यांनी वाहनाजवळील व्यक्तींना विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने घोलप यांनी आरडाओरड करत नागरिकांना मदतीसाठी बोलावले.

आरडाओरड ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या गोंधळात दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून ठेवले, मात्र उर्वरित चार आरोपी अंधाराचा आणि गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि इतर पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी तसेच डोंगर-दरी परिसरात शोधमोहीम सुरू केली. अनेक तासांच्या पाठलागानंतर पळून गेलेल्या चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे संपूर्ण टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

तपासादरम्यान आरोपींकडे सापडलेल्या शस्त्रांमुळे ते मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे, चोरीची बोलेरो आणि इतर साहित्य जप्त केले. यानंतर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली.

चौकशीत आरोपींवर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे किमान २० गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये दोन दरोडे, एक दरोड्याचा प्रयत्न, दोन जबरी चोरी, तेरा घरफोड्या आणि दोन वाहन चोरीचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय विविध राज्यांमध्ये त्यांच्यावर ५० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही तपासात समोर आले आहे.

या टोळीचा पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दरोडा टाकण्याचा बेत होता, त्यांच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का, चोरीची वाहने वापरून यापूर्वी किती गुन्हे करण्यात आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ग्रामस्थांची जागरूकता, तातडीने पोलिसांना दिलेली माहिती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या समन्वित कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात घडू शकणारा मोठा दरोडा वेळेत हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!