लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ महिलांच्या खात्यातही जमा होणार पैसे; आदिती तटकरे यांची महत्त्वाची घोषणा


पुणे : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही ज्यांच्या खात्यात मासिक हप्ता जमा झाला नाही, अशा महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

कोणत्याही पात्र महिलेला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून, पात्र लाभार्थींना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

मात्र, ई-केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांना अद्याप योजनेचा हप्ता मिळालेला नाही. अशा सर्व प्रकरणांची आता पुन्हा छाननी आणि क्रॉस-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ऑगस्ट 2025 मध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. लाभार्थींना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला वेळ देण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आली आणि अखेर 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली.

यानंतर ज्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या, त्या दुरुस्त करण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

दरम्यान, सुमारे 60 लाखांहून अधिक महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच उत्पन्नाच्या अटी पूर्ण न झाल्याने सुमारे 13 ते 14 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

मात्र, सर्व पात्रता निकष पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे अशा अर्जांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली असून पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकारकडून प्रक्रिया राबवली जात आहे.

याशिवाय, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज केला आहे, मात्र कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले. पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!