पुणेकरांसाठी मोठी बातमी! पावसाळ्यातही पाणी कपात; ‘या’ तारखेपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिकेचा मोठा निर्णय


पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या, 15 जुलैपासून पुणे शहरात पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लाखो वारकरी दाखल झाले होते.

या काळात वारकरी आणि शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय काही काळासाठी स्थगित केला होता. मात्र आता हा निर्णय पुन्हा लागू करण्यात येणार आहे.

पुणे शहराची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खडकवासला धरणात सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल 4.12 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि वर्षभर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी महापालिकेने पुन्हा पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. अनेक धरणांमधील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने प्रशासनाला पाणी नियोजन करावे लागत आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी पुण्यात असल्याने तो निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

वारीच्या काळात वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेकडून अतिरिक्त पाणीपुरवठ्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र वारीचा कालावधी संपल्यानंतर पाणी बचतीच्या दृष्टीने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

खडकवासला परिसरात काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला नव्हता. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे पुढील काळात पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे पुढील काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 15 जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!