पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला पुन्हा विलंब; प्रवासी सेवा सुरू होण्याची नवी तारीख समोर

पुणे : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 प्रकल्पाची सर्व तयारी पूर्ण असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रवासी सेवा सुरू होण्यास पुन्हा विलंब झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांचे लक्ष नवीन तारखेच्या घोषणेकडे लागले आहे.

हिंजवडी ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला अंतिम अहवाल आणि व्यावसायिक वापरासाठीची मंजुरी मिळणे बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यापूर्वी 15 जुलैपासून मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही सेवा आता ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 3 प्रकल्पाला याआधीही अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासकीय प्रक्रिया, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि पावसामुळे रखडलेली कामे यामुळे प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र सेवा पुन्हा लांबल्याने नियमित प्रवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
23 किलोमीटर लांबीच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 3 प्रकल्पाच्या मुदतीत आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला संपूर्ण मार्ग एकाच टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र नंतर टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.