आषाढी वारीत यवतकरांची सेवेची परंपरा पुन्हा उजळली! ‘विठू माऊली’च्या लाखो वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं, दीड लाख भाकऱ्यांचं अन्नदान


यवत : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या यवत मुक्कामानिमित्त गावकऱ्यांनी यंदाही सेवाभाव, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवून आणला. तब्बल ८२ वर्षांपासून अखंड सुरू असलेली अन्नदानाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. लोणी काळभोर ते यवत असा पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं आणि सुमारे दीड लाख भाकऱ्यांची भव्य भोजनव्यवस्था करण्यात आली.

यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात पहाटेपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू होती. यासाठी विशेष उभारलेल्या मोठ्या कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं बनवण्यात आले. एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं तयार होत असून त्यासाठी २० किलो बेसणासह कांदा, मिरची, लसूण, तेल आणि मसाल्यांचा वापर करण्यात आला. अशा १४ ते १५ कढईंमधून तयार झालेले पिठलं वारकऱ्यांना वाढण्यात आले.

दरम्यान, गावातील घराघरांत भाकरी करण्याचे काम सुरू होते. महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाकऱ्या तयार केल्या, तर युवकांनी त्या संकलित करून भोजनस्थळी पोहोचवण्याची जबाबदारी सांभाळली. पिण्याच्या पाण्यापासून भोजन वाढण्यापर्यंत, स्वच्छतेपासून शिस्तबद्ध नियोजनापर्यंत प्रत्येक कामात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

यंदाच्या अन्नदानामागे केवळ परंपरा नव्हे, तर संतांच्या शिकवणीतून रुजलेला सेवाभाव आणि ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ ही भावना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीने ही जबाबदारी समर्थपणे पेलत परंपरेचा वारसा पुढे नेला.

या भोजनाचा लाभ केवळ वारकरीच नव्हे, तर पालखी सोहळ्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेले पोलीस, आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर शासकीय यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी यांनीही घेतला. अनेक अधिकारी दरवर्षी यवतच्या गावरान पिठलं-भाकरीची आवर्जून प्रतीक्षा करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यंदा वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन भोजन व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची व्यवस्था करून यवतकरांनी ‘अतिथी देवो भव’ आणि ‘सेवेतच विठ्ठल’ ही संतांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून पुन्हा एकदा जिवंत केली. गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून उभी राहिलेली ही अन्नसेवा आषाढी वारीतील श्रद्धा, एकोपा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!