“विनायक राऊतांनाही अटक झाली पाहिजे’; सुनेच्या तक्रारीनंतर गिरीजाच्या आईचा गंभीर आरोप, 3 वर्षे बैठकीसाठी विनंती केल्याचा दावा”


ठाणे : माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ, फसवणूक आणि अघोरी प्रथांचा वापर केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांच्या आई पूजा पवार यांनीही पुढे येत राऊत कुटुंबावर थेट निशाणा साधला आहे. केवळ गितेश राऊतच नव्हे, तर विनायक राऊत यांनाही या प्रकरणात आरोपी करून अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूजा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलगी माहेरी आल्यानंतर आम्ही हा वाद न्यायालयात किंवा पोलिसांत न नेता सामोपचाराने सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. सलग तीन वर्षे आम्ही राऊत कुटुंबाकडे बैठकीसाठी वेळ मागत होतो. मात्र, प्रत्येक वेळी आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अखेर कायदेशीर मार्ग स्वीकारण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही, असा दावा त्यांनी केला.

गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत विवाहापूर्वी महत्त्वाची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पती गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे लग्नानंतर समजले. ही बाब लपवून विवाह लावण्यात आला आणि त्यानंतर मानसिक त्रासासह विविध प्रकारचा छळ सहन करावा लागला, असा त्यांचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर ही समस्या दूर करण्यासाठी अघोरी विधी करण्यात आल्याचाही दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळासह अंधश्रद्धा व अघोरी प्रथांविरोधातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा संपूर्ण वाद घटस्फोटाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. गिरीजा आणि गितेश गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचे सांगत त्यांनी, तक्रार दाखल होण्यापूर्वी मोठ्या आर्थिक मागण्या करण्यात आल्याचा दावा केला. दरमहा पाच लाख रुपये खर्च, दहा कोटी रुपयांची रक्कम, दोन कोटी रुपयांची मानसिक नुकसानभरपाई, पाच खोल्यांचा फ्लॅट आणि आलिशान कारची मागणी करण्यात आली होती. या मागण्या मान्य न झाल्यामुळेच आता खोटे आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र, पूजा पवार यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “जर आम्हाला पैशांचीच लालसा असती, तर आम्ही तीन वर्षे शांत बसलो नसतो. आमची एकच इच्छा होती की मुलीचा संसार टिकावा. राजकीय प्रभावामुळे आम्ही अनेक दिवस संयम बाळगला. मात्र, मुलीवर सातत्याने मानसिक दबाव टाकला जात होता. फोनवर बोलतानाही स्पीकर सुरू ठेवण्यास भाग पाडले जात होते. तिला शिवीगाळ केली जात होती आणि तिचा गैरफायदा घेण्यात आला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

याशिवाय, “पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंधच नसतील तर मूल होणार कसे?” असा सवाल उपस्थित करत पूजा पवार यांनी तपास यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिसांकडून तक्रारीतील सर्व आरोपांची पडताळणी सुरू असून संबंधित पक्षांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील तपासाचा अहवाल आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!