पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले! मुसळधार पावसाने भरली धरणे; महापालिकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या पुढील नियोजन


पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा म्हणजेच पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने तूर्तास घेतलेला नाही. धरणातील वाढता साठा आणि नागरिकांची गरज लक्षात घेता पुणेकरांना सध्या नियमित पाणीपुरवठा मिळणार असल्याची शक्यता आहे.

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे उन्हाळ्यानंतर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. धरणातील साठा चार अब्ज घनफूटांपेक्षा खाली गेल्यानंतर जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणी वापराबाबत कठोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानंतर पुणे महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पाणी बचतीसाठी वॉशिंग सेंटरवर निर्बंध, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळणे अशा उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.

मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पुणे शहर आणि विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. गेल्या काही दिवसांत धरणसाठ्यात तब्बल १३ टीएमसीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळीत १६.६४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा ९ ते १२ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पाणीकपात सुरू होणार का, याबाबत पुणेकरांमध्ये चिंता होती.

मात्र, धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता पाणीकपात पुन्हा लागू करू नये, अशी भूमिका महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. अचानक पाणीकपात लागू केल्यास नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

पुणे महापालिका प्रशासनाकडून धरणातील पाणीसाठा, पावसाची स्थिती आणि भविष्यातील पाण्याची गरज याचा आढावा घेतला जात आहे. आगामी काळात पाऊस कसा राहतो यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे. सध्या मात्र पुणेकरांना पाणीकपातीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!