‘मान्यता’ची स्वाक्षरी अन् राजकारणात नवी खळबळ! अजितदादा गटाच्या बॅनरवर पुन्हा झळकणार शरद पवार; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच जळगावमधील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पक्षाच्या बॅनर आणि पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यास स्वतः शरद पवार यांनी लेखी परवानगी दिल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी गट जवळ येत असल्याच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना एक पत्र दिले. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतरही शरद पवार यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त केला. तसेच त्यांचे वडील मुरलीधर अण्णा पवार हे शरद पवार यांचे जुने सहकारी व मित्र असल्याचा उल्लेख करत, “मित्राच्या मुलाच्या नात्याने मला आपल्या छायाचित्राचा वापर करण्याची परवानगी द्यावी,” अशी विनंती केली.
संजय पवार यांच्या म्हणण्यानुसार, त्या पत्रावर शरद पवार यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात “मान्यता” असे लिहून स्वाक्षरी केली आहे. या परवानगीची प्रत त्यांनी माध्यमांसमोरही सादर केली. त्यामुळे ही केवळ एका कार्यकर्त्याला दिलेली परवानगी आहे की त्यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरणे थांबवण्यात आले होते. मात्र आता मिळालेल्या या कथित परवानगीनंतर जळगावमधील सर्व पक्षीय बॅनरवर अजित पवार आणि शरद पवार यांचे फोटो एकत्र झळकणार असल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर ही परवानगी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून, यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पत्र देणार असल्याचे सांगितले.

या संपूर्ण घडामोडीची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. कारण गेल्या आठवडाभरात शरद पवार यांच्या एनडीएत जाण्याच्या चर्चांपासून जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीपर्यंत अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण तापले होते. विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत जाण्याच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या.
दरम्यान, जळगावमधून समोर आलेल्या या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संवादाची नवी दारे उघडत आहेत का, की हा केवळ वैयक्तिक पातळीवरील निर्णय आहे, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात अजित पवार गटातील इतर नेत्यांनाही अशीच परवानगी मिळते का, यावरही अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.