दूध पिण्यापूर्वी सावधान! पिशवीबंद दुधात सुरू होती धक्कादायक भेसळ; FDA च्या कारवाईत एकाला अटक


मुंबई : अन्न व औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी हाती घेतल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये FDA कडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत असून, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट केला जात आहे. आता मुंबईतील दहिसर परिसरात FDA ने मोठी कारवाई करत दूध भेसळीचे रॅकेट उघडकीस आणले आहे.

दहिसर बृहन्मुंबई विभागात गेल्या काही दिवसांपासून दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे FDA अधिकाऱ्यांनी नियोजन करून सापळा रचला आणि दहिसर परिसरात धडक कारवाई केली.

या कारवाईदरम्यान FDA च्या पथकाने तब्बल 470 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे हे दूध अत्यंत धोकादायक पद्धतीने तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेले दूध मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याने प्रशासनाने तातडीने ते नष्ट केले.

जप्त केलेल्या भेसळयुक्त दुधाची किंमत 29 हजार 750 रुपये इतकी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या दूध भेसळीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

FDA च्या या कारवाईमुळे दहिसर आणि परिसरातील दूध भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळखोरांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

तसेच नागरिकांनी दूध खरेदी करताना सतर्क राहावे, दुधाच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!