पालखी सोहळ्याच्या ठळक नियोजनाने वारकऱ्यांचे लक्ष वेधणार; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण योजनेतून सुमारे साडेतीन कोंटी खर्चाने मुक्काम व विसावा स्थळ सुसज्ज…


जयदिप जाधव

उरुळी कांचन : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत, राज्याच्या ग्रामविकास विभागाने यंदाच्या पालखी सोहळ्याला मुक्काम, विसावा, स्वागत तयारी तसेच पालखी सोहळ्यात सुविधा पुरविण्यासाठी खर्चाची तयारी केल्याने यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचा खर्चाचा भार कमी झाला असून या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आकर्षक स्वागत कमानी, मुक्काम स्थळ, विसावा स्थळ तसेच सुविधांनी लक्ष वेधून घेऊ लागला आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी शनिवार दि.११ रोजी दाखल होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदाच्या सोहळ्याला ग्रामविकास विभागातर्फे सुविधा व्यवस्था केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या सोहळ्यासाठी सुमारे साडे तीन कोटी खर्चाची तरतूद झाली आहे.

पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा व तालुक्यांच्या ठिकाणी विसावा, मुक्काम व स्वागत कमानी व इतर सुविधांना भरघोस निधी प्राप्त झाला आहे. लोणी काळभोर कवडीपाट येथे स्वागत कमान, पालखी तळावरील एकादशीचा मुक्काम तर रविवारी दुपारी १ च्या सुमारास उरुळी कांचन येथे विसाव्यासाठी प्रशस्त तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार दर्जेदार पालखी मंडप उभारण्यात आले आहे.

यंदाच्या स्वागतासाठी पावसाचे दिवस गृहीत धरुन या ठिकाणी ८० फुट रुंद आणि २०० फुट लांब सुमारे २० फुट उंच अशा भव्य मंडपाच्या उभारणीचे काम सुरू आहे.तसेच पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना व पंचक्रोशीतील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंडपाभोवतीच्या परिसरामध्ये मुरमीकरण करून कोठेही पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. या दर्जेदार आयोजनातून यंदाचा सोहळा शासकीय नियोजनाचे लक्ष वेधून घेत असून या नियोजनाने सोहळ्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींवर पडणारा खर्चाचा भार कमी झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!