अजित पवारांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याची मागणी; राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने केली आहे.

यासंदर्भातील अधिकृत निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे अधिकृत शिफारस प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली असून विकासाभिमुख प्रशासनाला त्यांनी गती दिली.

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पांमधून राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. तसेच शेती, सहकार, सिंचन, जलसंपदा, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

विशेषतः शेतकरी, ग्रामीण भाग आणि सहकार क्षेत्रासाठी घेतलेले निर्णय हे त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाने म्हटले आहे.

अजित पवार यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय असल्याने त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!