पुणेकरांनो घाटात फिरायला जाणार असाल तर सावधान! निसर्ग दाखवणार ‘रौद्र रूप’; हवामान विभागाचा इशारा


पुणे : पुढील दोन दिवस पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर हवामानाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी, महाबळेश्वर यांसारख्या घाट परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वायव्य मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेल्या चक्राकार कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. गुरुवार (९ जुलै) आणि शुक्रवार (१० जुलै) रोजी पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे डोंगर उतारावरून पाण्याचे प्रवाह, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाट रस्त्यांवरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरासाठी मोठ्या पावसाचा इशारा नसला तरी पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी २० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

पुण्याबरोबरच कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!