मराठवाडा हादरला! मध्यरात्री भूकंपाचे सलग ४ धक्के; हिंगोली, नांदेड, परभणीत भीतीचे वातावरण


मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड परिसरात रात्री उशिरा जमिनीला हादरे बसले.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, पहिला धक्का मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली. अचानक झालेल्या या हादऱ्यांमुळे गाढ झोपेत असलेले नागरिक घाबरून घराबाहेर सुरक्षित ठिकाणी आले.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे पांगरा गावासह परिसरात या भूकंपाचा प्रभाव जाणवला. या धक्क्यांचे पडसाद शेजारील नांदेड जिल्ह्यातही उमटले असून, काही भागात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का नोंदवण्यात आला.

नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर आणि निळा रोड परिसरातील नागरिकांना भूकंपाचे हादरे जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नाही.

दोन तासांत चार धक्के; नागरिकांमध्ये वाढली चिंता

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १.३७ ते पहाटे ३.२३ या कालावधीत तब्बल चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. कमी वेळेत लागोपाठ आलेल्या या धक्क्यांमुळे प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.

हिंगोलीत यापूर्वीही भूकंपाच्या घटना

गेल्या काही वर्षांत हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत तालुक्यांमध्ये वेळोवेळी भूगर्भातील हालचाली जाणवल्या आहेत.

या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!