आबिटकरांच्या पाहणीनंतर अवघ्या २४ तासांत औंध जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; मोहोळांच्या पत्राने आरोग्य विभागात खळबळ

पुणे : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीनंतर अवघ्या चोवीस तासांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रुग्णालयातील गंभीर त्रुटींची दखल घेत प्रशासनाला कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रात रुग्णसेवेतील उणिवा दूर करून १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोहोळ यांनी शवागारातील दोन्ही शवपेट्या नादुरुस्त असल्याचे नमूद करत त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. गरज भासल्यास येरवडा मानसिक रुग्णालयातील अतिरिक्त शवपेट्या तात्पुरत्या उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. डायलिसिस विभागातील निर्जंतुकीकरणाविषयीच्या तक्रारी, रात्री गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयांत पाठविण्याचे प्रकार आणि कोविड काळात उभारण्यात आलेल्या प्राणवायू प्रकल्पाचा अपुरा वापर याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
विशेष नवजात अतिदक्षता विभागासाठी मंजूर २४ खाटांपैकी केवळ १२ खाटा कार्यरत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व खाटा तातडीने सुरू करण्याबरोबरच पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजलेल्या रुग्णांसाठी मंजूर दहा खाटांचा विभाग, आवश्यक मनुष्यबळ आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे आरोग्यमंत्र्यांच्या पाहणीनंतरही रुग्णालयातील समस्या का कायम राहिल्या, याबाबत चर्चा सुरू झाली असून नव्याने नियुक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
