शाळांच्या वेळेत मोठा बदल! 30 जुलैपर्यंत सकाळीच भरतील वर्ग; शिक्षण विभागाचे नवे आदेश जारी

पुणे : राज्यातील मतदारयादींच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला वेग देण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी 30 जुलैपर्यंत राज्यातील शाळा शक्यतो सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शाळा प्रशासनाला परिपत्रक जारी केले आहे.

आदेशानुसार, बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमी आणि सलग ठेवाव्यात. तसेच बीएलओ नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार अध्यापन व इतर शालेय कामात सहकार्य करून संबंधित शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करावा. शाळा प्रमुखांनी अंतर्गत नियोजन करून अध्यापन आणि निवडणूक कामाचा समतोल राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्या अचूक व दोषमुक्त करण्यासाठी सुमारे 24 वर्षांनंतर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, सकाळ-दुपार अशा दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांचे नियोजन कसे करायचे, तसेच अध्यापनासह बीएलओची जबाबदारी सांभाळणे कठीण असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
