लोणावळ्यात निसर्गाचा रौद्रावतार! रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याने बचावकार्य युद्धपातळीवर

लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात अचानक भूस्खलन झाल्याने दोन व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक, बचाव पथके आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसडीओ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने बचाव मोहीम राबवली जात आहे.
सध्या लोणावळा आणि परिसरात पावसाचा जोर कायम असून डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा प्रशासनाने लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर कलम १६३ लागू केले आहे. त्यामुळे काही भागात पर्यटकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यातील विविध भागांमध्ये पावसामुळे दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि रस्ते बंद होण्याच्या घटना घडत आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंकवरही काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रशासनाने तातडीने कारवाई करत मार्ग खुला केला.

याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे परिसरातही डोंगराचा भाग कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागातील नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोणावळ्यातील बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.