काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग; ७२ प्रवाशांच्या डब्यात तब्बल ४०० जणांचा शिरकाव

नागपूर : वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला भाविकांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गर्दी घुसल्याने महिला प्रवाशांशी गैरवर्तन, छेडछाड आणि विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागपुरात पोहोचलेल्या पीडित महिलांना आपला अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले.

पीडित प्रवाशांनी सांगितले की, त्यांनी तीन ते चार महिने आधीच या रेल्वे प्रवासाचे आरक्षण केले होते. मात्र वाराणसी स्थानकावर गाडी आल्यानंतर आरक्षित डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रवासी शिरले. ७२ प्रवाशांची क्षमता असलेल्या डब्यात तब्बल ४०० हून अधिक जण घुसल्याने आरक्षित प्रवाशांनाही गाडीत चढणे कठीण झाले.
या गोंधळाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी महिलांना अयोग्य स्पर्श करत त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डब्यात प्रवेश केल्यानंतरही महिलांना अश्लील शेरेबाजी, छेडछाड आणि गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. विरोध करणाऱ्या काही पुरुष प्रवाशांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे पीडितांनी सांगितले.

घटनेची माहिती प्रवाशांनी तत्काळ रेल्वेच्या १३९ हेल्पलाईनवर दिली. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म **’एक्स’**वरही तक्रार नोंदवली. मात्र, वारंवार तक्रार करूनही वेळेत कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

दरम्यान, सततच्या छेडछाड आणि गैरवर्तनाला कंटाळून काही महिला प्रवाशांनी नैनी रेल्वे स्थानकावर गाडीसमोर आणि रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन केले. त्यानंतर उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, प्रचंड गर्दीमुळे तत्काळ कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.
कसेबसे नागपुरात पोहोचल्यानंतरही पीडितांना अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपुरात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता, घटना उत्तर प्रदेशातील असल्याने तेथेच तक्रार द्या, असे सांगण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरक्षित डब्यांमध्ये होणारी अनधिकृत गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.