संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

पुणे : पिंपरी-मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे देहू व आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. पूरस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी सध्या देहू-आळंदीत येऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी आणि पुणे किंवा पिंपरी-चिंचवड परिसरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यावरही पावसाचे सावट कायम आहे.
आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह विशेषतः मावळ, देहू आणि आळंदी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून देहू आणि आळंदी परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत.

इंद्रायणी नदीची वाढती पाणीपातळी आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता, वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा पुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह दोन्ही देवस्थान संस्थानांनी केले आहे.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान होणार असून त्याच दिवशी पालखीचा मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात असेल. तर ८ जुलै रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
तुकोबांच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा
यंदाचा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर आणि तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन करण्यात येईल.
सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणल्या जातील. पुढे पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजता पालखीची प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी पुन्हा इनामदार वाड्याकडे रवाना होईल. रात्री पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यातच असेल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.