खडकवासला धरणाचा धोक्याचा इशारा! मुसळधार पावसामुळे कधीही पाण्याचा विसर्ग; पुणेकरांसाठी प्रशासनाचा हाय अलर्ट


पुणे : पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणाबाबत प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील काही तासांत धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तसेच पर्यटकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

सोमवारी दुपारपर्यंत खडकवासला धरणात सुमारे 32 टक्के पाणीसाठा झाला असून, पावसाचा वेग कायम राहिल्यास हा साठा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून जनावरे, शेतीसाहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून उजनी धरणाच्या पाणीपातळीतही वेगाने वाढ होत आहे. पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पाटबंधारे विभाग 24 तास कार्यरत आहेत.

मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. लोणावळा-खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दगड आणि माती हटवण्याचे काम सुरू केले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, पुढील काही तास पुणे आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!