जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील धान्य गोदामाचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन..


पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना’ आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित येथे उभारण्यात आलेल्या ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

कार्यक्रमास नाबार्ड, पुणे विभागाचे सरव्यवस्थापक अविनाश सेवळकर, व्यवस्थापक प्रणित राज, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक गिरीश जाधव, शेती कर्ज विभागाचे श्री माळी, संस्था सक्षमीकरण समन्वयक रमेश बांडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲड. संजयराव काळे, जुन्नरचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) डॉ. गजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सभासद, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेल्हे येथे उभारण्यात आलेल्या या ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षित, वैज्ञानिक व आधुनिक धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, दर्जेदार साठवण आणि प्रभावी विपणनास चालना मिळणार असून सहकारी संस्थेच्या व्यवसायवृद्धीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या हस्ते देशभरातील सहकार क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये ‘जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना’ अंतर्गत देशभरातील २३२ धान्य गोदामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित यांच्यात केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारणीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील हिंगोणे येथे सुमारे १.२५ कोटी केळीच्या टिश्यू कल्चर रोपांची वार्षिक निर्मिती क्षमता असलेली प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

याशिवाय राष्ट्रीय सहकारी डेटाबेस (एनसीडी) पोर्टल ३.० चे जिओ-टॅगिंग सुविधेसह उद्घाटन, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचा (एनडीडीबी) दुग्ध सहकारी समीक्षा डॅशबोर्ड राष्ट्राला समर्पित करण्यात आला.

तसेच सहकारी निविष्ठा व सेवा वितरण बहुराज्य सहकारी संस्था मर्यादित (सीआयएसडीएमएल), सहकारी दूध उत्पादक संघटना बहुराज्य सहकारी संस्था मर्यादित (सीएमपीओएमएल) आणि गोमय सहकारी समिती बहुराज्य सहकारी संस्था मर्यादित या नव्या राष्ट्रीय बहुराज्य सहकारी संस्थांच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. तसेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ (एनयूसीएफडीसी) पोर्टल चे उद्घाटनही करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!