रात्रीची वेळ… बुधवार पेठेत 3 तरुण दिसताच 2 पोलिसांचं धक्कादायक कृत्य; कॅब चालकाच्या व्हिडिओमुळे काळा कारनामा उघड


पुणे : खाकी वर्दीचा धाक दाखवत तीन तरुणांकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस शिपायांनी तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ऑनलाइन दोन हजार रुपये उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हा हडपसर परिसरातील रहिवासी असून, एका हॉटेलमध्ये काम करतो. २९ जुलै रोजी तो आपल्या दोन मित्रांसह शनिवारवाडा पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर लक्ष्मी रस्ता परिसरात फिरून रात्री साडेआठच्या सुमारास तिघे बुधवार पेठेतून घरी जात असताना हा प्रकार घडला.

यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. त्यांनी तिघांना अडवून कोणताही गुन्हा नसताना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणांनी त्यांच्या सांगण्यावरून ऑनलाइन पद्धतीने दोन हजार रुपये संबंधित खात्यावर वर्ग केले.

यानंतर तिघांनी घरी जाण्यासाठी कॅब बुक केली. प्रवासादरम्यान त्यांनी संपूर्ण घटना कॅब चालकाला सांगितली. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कॅब चालकाने या प्रकरणाची व्हिडिओ क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत दोन्ही पोलीस शिपायांनी पदाचा गैरवापर करत तरुणांना धमकावून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २४ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!