डोळ्यांत भीती, चेहऱ्यावर चिंता; पुणे रेल्वे स्थानकावर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रवाशांचा खोळंबा


पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई मार्गावरील रस्ता आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लोणावळा परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे सेवेला मोठा फटका बसला असून, अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या तब्बल पाच ते सहा तास उशिराने धावत असल्याने पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

गाडी नेमकी कधी येणार, पुढील प्रवास कसा करायचा, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्लॅटफॉर्मवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, रेल्वे स्थानकांवर गोंधळाचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील नव्या मिसिंग लिंक परिसरात मोठी दरड कोसळली आहे. तसेच अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुना मुंबई–पुणे महामार्गही दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे.

याचबरोबर पुणे–मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेनंतर आतापर्यंत 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता आणि रेल्वे हे दोन्ही पर्याय बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

महामार्ग आणि लोहमार्ग पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय पुणे–मुंबईदरम्यानचा प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरड कोसळतानाचा व्हिडिओही समोर आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!