मुसळधार पावसाचा कहर! मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे बंद; मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत

पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे–मुंबई मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे आणि घाटमाथा परिसरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.

लोणावळा घाटातील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने आणि द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जुना मुंबई–पुणे महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून, दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोणावळा परिसरात तब्बल 35 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुणे–मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे सीएसएमटीहून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

महामार्ग आणि लोहमार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पुणे–मुंबईदरम्यान प्रवासाचे नियोजन केलेल्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी शासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.