मुसळधार पावसाचा परिणाम! आंबेनळी घाट सर्व वाहनांसाठी बंद; ‘या’ मार्गांचा वापर करा..

रायगड : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि वारंवार होत असलेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांचा विचार करून रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलादपूर–आंबेनळी–महाबळेश्वर घाटमार्ग ७ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

पोलादपूर–आंबेनळी–महाबळेश्वर हा मार्ग सह्याद्रीच्या डोंगररांगांतून जात असून येथे मोठे उतार, खोल दऱ्या, दाट जंगल आणि भूस्खलनाचा धोका कायम असतो. पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळणे आणि दगड घसरण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस रायगड जिल्हा आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात पोलादपूर परिसरात दोन वेळा दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या होत्या. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.

सध्या आंबेनळी घाटात संरक्षण भिंती, क्रॅश बॅरिअर्स, पाण्याचा निचरा व्यवस्था आणि इतर सुरक्षाविषयक कामे सुरू आहेत. ही कामे सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावीत, तसेच मुसळधार पावसाच्या काळात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी घाटमार्ग काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ३ जुलैपासून ७ जुलैपर्यंत आंबेनळी घाट सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महाड–माणगाव–ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर–चिपळूण–कराड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.