विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! खासदार बजरंग सोनवणेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा; SIT तपासाने वाढवल्या राजकीय धडधडी


बीड : बीड जिल्ह्यातील केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब पाथरकर यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आधीच चर्चेत असलेल्या प्रकरणातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

विलास घुले यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुरुवातीला पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेहासह आंदोलन छेडले होते. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आणि विशेष तपास पथक (SIT) ने तपास सुरू केला.

तपासादरम्यान सौरभ सोनवणे यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा न आढळल्याने जबाब नोंदवून त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब पाथरकर यांच्याविरोधात बदनामीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी पाथरकर यांनी रमेश घुले यांच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आपणास जाणीवपूर्वक बदनाम केल्याचा आरोप करत रमेश घुले यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला नवे राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले असून SIT चा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!