तुकाराम मुंढेंचा धडक ॲक्शन! दोन दिवसांत 20 हॉटेल्सची तपासणी; 7 परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद..

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत शहरातील २० नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने सात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

तपासणीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. चार हॉटेल्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवानाच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे पूर्ण होईपर्यंत संबंधित हॉटेल्सचा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत.
तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे, कोल्ड स्टोरेज आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन तसेच अन्न सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष अशा अनेक अनियमितता निदर्शनास आल्या. या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहीम पुढेही सुरू राहणार असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, प्रतिबंधित खाद्यपदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवण आणि विक्री करणाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी दाखल केलेल्या याचिकेत हा आदेश मनमानी असून नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने एफडीएसह गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून, तीन आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.