पुणे–सोलापूर महामार्गावर थरार! उभ्या मालवाहू टेम्पोला अचानक आग; लाखोंचे नुकसान

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावरील पाटस येथील बारामती फाट्यावर पंजाबी ढाब्याजवळ उभ्या असलेल्या मालवाहतूक टेम्पोला भर पावसात अचानक आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, वेळेत मदत पोहोचू न शकल्याने आणि स्थानिक नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने काही क्षणांतच टेम्पो जळून खाक झाला. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे–सोलापूर महामार्गालगत नवीन बारामती फाट्यावरील पंजाबी ढाब्याजवळ उभ्या असलेल्या मालवाहतूक टेम्पोला शनिवारी (दि. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या या टेम्पोच्या इंजिनच्या भागातून प्रथम धूर निघू लागला. त्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही आग वेगाने भडकली. ही घटना पाहताच परिसरातील नागरिक आणि ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. मात्र, तोपर्यंत आगीमुळे टेम्पोतील मालासह इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने वेळीच टेम्पोतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास पाटस पोलीस करत आहेत.
