दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, उत्पादनापासून विक्रीपर्यंत राहणार कडक नजर


मुंबई : राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, दूध भेसळीबाबतचे नवे नियम केवळ उत्पादकांपुरते मर्यादित नसून ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेनुसार दूध उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण साखळीतील प्रत्येक घटकाला लागू असतील.

मुंढे यांनी सांगितले की, दूध उत्पादक, दूध संकलन केंद्रे, दूध शीतकरण केंद्रे, दुग्ध प्रक्रिया युनिट्स, पॅकर्स, फिलिंग स्टेशन, वितरक, वाहतूकदार, घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच सुटे दूध विक्रेते या सर्वांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

यासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 मधील परवाना, नोंदणी, अन्न उत्पादन मानके, अन्न संयोजके, दूषके व अवशेष, विक्रीवरील निर्बंध, लेबलिंग, पॅकेजिंग आणि जाहिरात यांसंबंधीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 2006 च्या कायद्यासह 2011 मधील विविध नियमांचे पालन अत्यावश्यक असल्याचेही मुंढे यांनी नमूद केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

एफडीएच्या या निर्णयामुळे दूध उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या प्रत्येक घटकावर अधिक जबाबदारी येणार असून, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार दूध उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!